घोड्याचे भाव विचारणे – पुलकित वाक्प्रचार

आज आम्ही मराठी भाषेला एक नवा वाक्प्रचार बहाल करत आहोत. हा मराठी वाक्प्रचार आहे – घोड्याचे भाव विचारणे. हा नवा आहे याची खात्री नाही. पण नोंदीदाखल हे एक टिपण .

संदर्भ :-

पुलंच्या बटाट्याच्या चाळीतले कोचरेकर गुरुजी व्हिक्टोरियावाल्यास ज्ञानसंपादनाच्या उद्देशाने विचारतात ‘घोड्याचे भाव काय आहेत हो हल्ली?’

स्पष्टीकरण :-

या वाक्प्रचाराचा उपयोग चुकीच्या ठिकाणची चुकीची वर्तणूक दर्शवण्यासाठी करतात.

कोचरेकर मास्तर हे एक मध्यमवर्गीय सद्गृहस्थ. नाकासमोर चालणारे. नियमित आयुष्य जगणारे. एकदा ते नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जायला निघतात. प्रवास. व्हिक्टोरियाशेजारी बसल्यावर त्यांच्या अंगात प्रवासीपणाचे स्पिरीट संचारायला लागते आणि ते त्याला विचारतात हा धंदा तो कधीपासून करतोय. या प्रकारच्या प्रसंगात सगळ्याच गोष्टी मास्तरांच्या विरोधात जातात. कारण त्यांच्या या प्रश्नाला व्हिक्टोरियावाल्याचे उत्तर असते ‘अबे हट!’

हेतू वाईट नसतो, पण जागा चुकतात अशा पदत्राणांगुष्ठयोगावर जन्मलेल्या लोकांची साडेसाती सुरू झाली की त्यांच्या बाबतीत असे प्रसंग घडतात. हेतू सोडला तर इतर सगळ्याच गोष्टी चुकलेल्या असतात.

व्हिक्टोरियावाल्याने ‘अबे हट!’ असे म्हटल्यावर तरी यांना  शहाणपण यावे ना? पण नाही. यांना घोड्याचे भाव विचारण्याची बुद्धी सुचते!

उदाहरणार्थ वाक्यात उपयोग:

प्रसंग कट्यावरचा. एक कधीतरी येणारा पण सर्वांना परिचित असा मुलगा आज आलाय. राजे महान होते यावर झाडून सगळ्यांचे एकमत झालेले असताना, काही कारण नसताना, याला दुर्बुद्धी सुचते. हा म्हणतो ‘राजांचे कार्य संभाजीने धुळीस मिळवले.’ आता कट्ट्यावरच्या सगळ्यांचे संभाजीमहाराजांबद्दलचे मत त्यांना छावा शब्दाशिवाय दुसरी उपमा नाही असे असते. एकदोघांना त्याचे हे वाक्य म्हणजे तर प्रत्यक्ष राजांचा अपमान असल्यासारखे वाटते. मग कट्टा पद्धतीने या विषयावर ‘चर्चा’ होते. कट्ट्यावरून दोघेजण घरी जात असताना, याचा मित्र याला म्हणतो, ‘अरे हो. तुझे म्हणणे तुझ्यापुरते का होईना बरोबर असेल, हे बाकी कोणाला नाही, निदान मलातरी कळते. पण तुलाही घोड्याचे भाव विचारण्याची सवयच आहे. चल, भेटू पुढच्या रविवारी कट्ट्यावर.’

दुसरा प्रसंग ज्युनिअर कॉलेजमधील. तिला टॉम क्रुज आवडतो म्हणून मागच्या आठवड्यात तुम्ही मजेत केलेली तिची चेष्टा आठवून तुमच्या अंगावर आजही शहारे येताहेत. पण आज तिचा मूड बरा आहे. ती दुस‑या कॉलेजमधील तिच्या मैत्रिणीला घेऊन आलीये. तुम्ही सहासात मित्र मैत्रिणी कॅडबी खायला जाता. तिथे गेल्यावर ती म्हणते, ‘हिची intro करून देते. ही विजया. आम्ही शाळेत बरोबर होतो. वेगवेगळ्या डिव्हीजन मध्ये होतो त्यामुळे फक्त तोंडओळख होती. पण आता भरतनाट्यमच्या एकाच क्लासला जायला लागल्यापासून best friends झालोय.’ तुमच्या बरोबर असलेल्या एका मित्राच्या डोक्यात ‘विजया म्हणजे दस‑याला तिचा बर्थडे असणार ‑ नाहीतर अशी नावे नसतात हल्ली’, असे सूज्ञ विचार चालू असताना तुम्ही मात्र बोलून जाता, ‘भरतनाट्यम काकूब्रॅंड वाटते.’ यानंतर तुमचे तिच्याशी काही भांडण वगरे नाही होत. पण पुढे कायम सन्नाटा असतो. याला ‘घोड्याचे भाव विचारणे’ असे म्हणतात. नाही. मला माहीत आहे, तुम्ही असे म्हणणार नाहीत. पण अशा प्रसंगातल्या त्याला कोणीतरी अंगावरची कातडी सोलण्याखालोखाल क्रूर शिक्षा म्हणजे हा सन्नाटा वाटेल. कोचरेकर मास्तरांच्या ‘घोड्याचे भाव काय आहेत हो हल्ली’ या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून व्हिक्टोरियावाल्याने ‘ए पाणीवाला’ असे रस्त्यावरच्या पाणीवाल्याला हटकल्यावर कोचरेकर मास्तरांनाही असेच काहीसे वाटले असेल.

असे अंतू बर्व्याच्या अण्णू गोगट्या type चे – म्हणजे पुलंच्या लेखनाचा संदर्भ असलेले – अनेक वाक्प्रचार मला सुचताहेत : बाबा बर्व्यांचा धंदा विचारणे, बाबा बर्व्यांसाठी सूट शिवू पाहणे, दुष्यंत नावाचा कुत्रा पाळणे, पानवाल्यासारखे चित्र काढणे, बेंबटेरावांचे नाव घेणे, शाळेपर्यंतचा पत्ता सांगणे, थर्मासची तारीफ करणे, बेंबट्यासारखा सूर देणे, येरकुंडकराचा सत्कार करणे, कामतमामांसारखा सूर लावणे, गाळीव इतिहास लिहिणे, चितळे मास्तरकी करणे, दामले मास्तरकी करणे, इ. इ.

असेच उपमांबाबतही. अर्थात नारायण, गंपू, हरितात्या, गटणे, रावसाहेबांसारखा राजा आदमी, वगैरे उपमा प्रचलित आहेतच.

यात भर घालणार असाल तर thanks in anticipation.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.