लीना वावडेकरांचे पाठलाग हे पुस्तक मी लहान असताना वाचले होते. माझ्या मामाकडे एका आलुमिनियम कलरच्या पेटीत पुस्तकांचा बराच साठा होता. (२०११ च्या cricket world cup वेळी ही जाहिरात आली होती – कोणत्या तरी टॉर्चवाल्या मोबाईलची – यह गोट नही है, यह बोट नही है, यह कभी कभी बीबी है- आलुमिनियम-सुब्रमन्नम असे काहीतरी होते) पुस्तके अशी मातृकथा, चांदोबा, पुराणातील स्त्रीकथा वगैरे. लहान मुलांना आवडतील अशी. आणि उन्हाळ्याच्या/ दिवाळीच्या सुटीत वाचून पूर्ण होतील अशी. एकदा वाचले परत पुढच्या सुटीत पेटी उघडायची.
माझे मावसभाऊ माझ्यापेक्षा लहान तर मामालोक थोडेसे मोठे. मग मी तीच तीच पुस्तके परत परत वाचत बसायचो दर सुटीत. तेव्हा वाचलेल्या चांदोबातल्या जातक कथा, ‘क्रमशः’ ने संपण्या-या कथा, विक्रमवेताळाच्या कथा, शची, देवहूती, दिती-आदिती, अनसूयेच्या कथा आजही अंधूकशा आठवतात.
पाठलाग हे माझे अत्यंत आवडते पुस्तक. माझे अगदी प्रेमच आहे त्या पुस्तकावर म्हणलं तरी गैर नाही.
कव्हरवर एका जॅग्वारचे चित्र. बिचू. वरच्या उजव्या भागात. खाली डावीकडे एक आदिवासी माणूस. आणि त्याची मुलगी. उरुबेलावा आणि मारिया. त्याच्या पायाला भाता आणि एक बाण धनुष्याला प्रत्यंचा ताणून बिचूवर रोखलेला.
पुस्तकाची सुरुवात… बिचू जखमी झाली होती. जबर….
एक जॅग्वार आपल्या घरापासून खूप दूर आलीये. अजून लहान आहे. तिला आता जखमी अवस्थेत फक्त घर दिसतेय. तो उंच सुळका दिसतो ना दूरवर… तिथे आहे तिचे घर. मध्ये पंपासचा सपाट माळ आहे. एका बाजूला तशी उंच-दाट झाडी आहे. पण माळ पार करायलाच लागेल.
उरुबेलावाला तिचा माग लागलाय. एक पायाने ती लंगडतेय हे पाऊलखूणांवरून उमगलेय. मारियाला घेऊन तो तिच्या मागावर निघालाय. रानटी झुडपाच्या फुलांची माळ करून गळ्यात घालण्याइतकी लहान त्याची ती मुलगी. तिला घरी जायचंय. पण तिची कातडी विकून…मारियाला…
मध्ये नदी येते… लहान प्राण्यांचीसुध्दा शिकार करायची ताकद नाहीये आता बिचूत… रक्ताची उबळ… वणवा येतो… मुसळधार पाऊस येतो… माग धुऊन जातात… स्वच्छ उन येतं… नवे माग तयार होतात… या खुणा बघ. ही माझी जग्वार… कोसळणा-या धबधब्याच्या पातळ पडद्याच्या एका बाजूस बिचू आणि दुस-या बाजूस उरुबेलावा असे श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग येतात… एका उडीत ती त्याच्या नरडीत दात खूपसू शकते असा विचार तिच्या मनात येतो… पण तिला घरी जायचं आहे. आईकडे… पण आई बहुधा मारली गेलीये… तो विचारच नको आता… घोडे, बंदुका आणि शिकारी कुत्रे घेऊन शहरातील शिकारी येतात… बिचू त्यांच्या हाती न लागता आपल्या हाती लागावी अशी त्याची ईर्षा… पण त्यालाही त्या शिका-यांपासून धोका आहे…मारियाला आता बिचूबद्दल जवळीक वाटू लागलीये… तिच्या बोलण्यातून ते जाणवतंय… मारियाच्या अंगाला माश्या डसतात… त्यावर तोंडात भिजवलेला तंबाखू लावतो तो…पण त्या जॅग्वारला मी मारीनच… एक दिवस झोपेतून उठल्यावर बाप दिसत नाही तर मारिया घाबरून जाते… बाप नदीवर जाऊन नव्या दिशेला जाणारा माग शोधून आलाय… अगं ती भारीच आहे हां, पोरी… अगदी माझ्यासारखी आहे… हट्टी…इरेला पेटलेली… अशी बापाने कबुली द्यायला सुरुवात केल्यावर मारियाला बरे वाटते… पुन्हा नवा माग… तो सुळका दिसतो ना तिकडे चाललीये ती… माझ्या लक्षात आलंय… वाटेत तिची कोणाशीतरी झुंज झालेली दिसतेय… रक्त सांडलेले दिसतेय… मात्र तिने काहीतरी खाल्ले असणांर… जखमी पाय बरा होऊ लागलाय तिचा… हे ठसे बघ… ती बघ, तिकडे दूर दिसतेय बघ ती जॅग्वार.
सुळका आता जवळ आलाय… मधला हा एक चढ पार केल्यावर तिला या बापलेकींपासून धोका नाही…
पोरी तू थांब इथेच… मी पळत पुढे जातो… तो चढ पार केला तिने तर ती हातातून निसटलीच समज.
पोरगी धावत येते मागून… उरुबेलावाला कळतं पोरीचं मन द्रवलंय…
चढावर बिचू त्याला दिसते… तीसुद्धा वळून बघते…. तो धनुष्याला बाण लावतो… पोरगी बघतेय… बाण न मारता तो जाऊ देतो तिला… मनात आणलं असतं तर मारू शकलो असतो तिला.
एकदा कधीतरी आजीने ती पेटी रिकामी केली… मी त्यानंतर पुण्यातल्या कित्येक दुकानांत ते पुस्तक शोधले. मामाच्या लग्नात मधून वेळ काढून नाशिकमध्येही शोधले… सावा (सार्वजनिक वाचनालय) मध्ये बघा म्हणाले तिथले दुकानदार… सावामधून प्रकाशक कळाले – पुण्याचे उत्कर्ष प्रकाशन. आधी त्यांचा दुकानात विचारले होते… आता मागे जाऊन प्रकाशनात विचारले… ते म्हणाले कोणत्या प्रकाशनाचे आहे? सुदैवाने रॅकवरच सापडले. किंमत चाळीस रुपये. चारशे असती तरी घेतले असते ते पुस्तक. इतका मी त्या पुस्तकाबाबत nostalgic आहे. घेतले. पाच –सहा वर्षांपूर्वी वाचले. नंतर काका घेऊन गेले वाचायला. वाचले नसणारच. पण कुठेतरी हरवून टाकले. पुस्तकांची अशी हेळसांड मला आजिबात आवडत नाही. आता ते पुस्तक कुठेच मिळत नाही. रस्त्यावर, लयब्ररीज आणि उत्कर्षमध्येसुद्धा. ते म्हणाले वाघाचं चित्र असंलेलं माडगुळकरांचं वाघाच्या मागावर आहे. चांगले आहे. देऊ का? त्यांना कसे सांगू … बालपणीची आढवण माडगुळकर कशी चितारतील. माडगूळकरांच्या आजीने पाहिलेल्या चोराच्या आडवणीही आहेत. पण ही गहिरी आहे. चिखलात हत्तीच्या पायाने ठसवल्यासारखी.
Do I hate my uncle? Yes, in this context. जंग जंग पछाडले तेव्हा तो बालपणीचा ठेवा परत मिळाला होता. आणि तो इतका casually उधळला गेला.
एक आशा आहे… पुढेमागे लीना बावडेकर, त्यांची मुले, नातवंडे हा पोस्ट वाचतील. आणि कदाचित त्यांच्याकडे असलेल्या प्रतींपैकी एखादी मला मिळेल. किंवा कोणीतरी स्कॅन केलेली कॉपी देईल मला.